आश्रमशाळा

कार्यालय:- प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग मुंबई (सिंधुदुर्ग)
अ.क्र. जिल्हा तालुका आश्रमशाळेचे नांव
1 सिंधुदुर्ग कणकवली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डे, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग
Image 1

यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा

श्री. स्पिनील सोनू येडगे (आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी)

श्री. स्पिनील सोनू येडगे (आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी)

वनळेली बामनियाडी, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

मेडिजेस्ट फार्मास्युटिकल कंपनी, गोवा येथे इंजिनिअर

मी गाव वस्तीपासून दूर, अतिदुर्गम डोंगराळ भागात आमच्या कुटुंबासोबत झोपडीवजा घरात शेळ्या घेऊन राहायचो. अशा या वाडीत आमचा जन्म झाला. आमच्या वाडीतून शाळा फार दूर होती, ना रस्ता, ना कुठल्याही सोयी-सुविधा. डोंगर-दऱ्यांतून खडतर प्रवास करत जाणे नकोसे वाटायचे. अशा अंधाराच्या वळणावर एकेदिवशी सन्माननीय कपे सर (शिक्षक, आश्रमशाळा बोडगवे) यांनी रात्री ८.०० वाजता आमच्या घरी वाडीतील लोकांना एकत्र केले. अंधुक प्रकाशात गॅसबत्त्या पेटवल्या गेल्या. त्या क्षणापासून दूर असणाऱ्या आमच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी आमच्या वाडीत सभा घेऊन शासनाच्या योजना आणि आश्रमशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. स्वावलंबनातून सुसंस्कृत मूल घडवणारी एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आश्रमशाळा याबद्दलही माहिती दिली. आणि दुसऱ्याच दिवशी आमच्या वाडीतील १०-१२ मुले ट्रक/ट्रॅक्टर गाडीत बसून आश्रमशाळेत प्रवेशित झाली. तेथे आम्हाला आईवडिलांप्रमाणे सांभाळणारे उत्तम गुरुजन लाभले. आपण कसे वागावे, स्वावलंबन, चिकाटी, जिद्द याचे बाळकडू आश्रमशाळेतच मिळाले. स्वावलंबनाबरोबरच मुल्यशिक्षण, सकाळी लवकर उठून सुंदर व्यायाम, मनाची एकाग्रता वाढवणारी प्रार्थना, स्वयंपाकशास्त्र, विविध क्रीडाप्रकारांचा घेतला जाणारा सराव – सगळेच वातावरण चैतन्यमय होते. येथेच आम्ही सर्व धर्मसमभाव, मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला देणे याची मौलिक बीजे रुजवली गेली.

यानंतर पुढे जाऊन डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी.कॉम. पदवी मिळवली. सध्या मेडिजेस्ट फार्मास्युटिकल कंपनी, गोवा येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आमच्या घराजवळून वाहणारा ओढा, नदी आणि दूरवर असलेली आमची शाळा – यामुळे आम्हाला प्राथमिक शिक्षण मिळणे कठीणच होते. पण शासनाने सुरू केलेल्या भटक्या व विमुक्त जमातींसाठीच्या आश्रमशाळेमुळे आम्ही प्राथमिक शिक्षण घेऊ शकलो आणि शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकलो. धन्य ते आमचे गुरुजन, ज्यांनी आम्हाला योग्य दिशा दाखवली, आणि तेथील कर्मचाऱ्यांनी आईच्या मायेसारखे जपले. याचमुळे आज आम्ही आमच्या समाजात काहीतरी करून दाखवू शकलो.

मी क्षणाक्षणी ऋणी आहे की शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत शिक्षण घेतल्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाचे पोट भरू शकलो. त्याचबरोबर आज मला मानसन्मान मिळाल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. आम्ही घेतलेले शिक्षणातील यश पाहून आमच्या गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत आहे. तरी, ही आश्रमशाळा भटक्या जमातीतील गरगरीब आणि दुर्गम भागातील लोकांसाठी संजीवनी ठरत आहे. ही योजना अशीच चालू राहो आणि माझ्यासारख्या शिक्षणापासून वंचितांना आधार बने.